Mumbai: गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी बोरीवली रेल्वे स्टेशन पुलावरून एका संशयित तरुणाला ट्रॉली बॅगेसोबत पकडले आहे. बॅगेत पोलिसांना पिस्तूल आणि 14 जिवंत गोळ्या आढळून आले. आरोपी मॉडेलिंगचे काम करतो. अभय कुमार असे त्याचे नाव आहे. तो मीरा रोड येथील रहिवासी आहे. गुरुवारी अभयला पोलिसांनी अटक केले. (हेही वाचा- संपत्तीच्या वादातून बापाकडून पोटच्या पोराची निर्घृण हत्या; भंडाऱ्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास एका पोलिस कॉन्स्टेबलने अभयला रोखले. त्याच्याकडे असलेल्या बॅगीची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी विचारणा केली. अभयने भरपूर टाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बॅग उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ऑफिसमध्ये नेले.
बॅग तपासली तेव्हा पोलिसांना मेड इन इटली ऑटो पिस्तूल आणि 5,040 रुपये किमतीच्या 14 जिवंत गोळ्या सापडल्या. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. चौकशीतून असे आढळून आले की, कुमार हा मुळचा बिहार येथील बराईचक पाटम गावचा रहिवासी आहे. तो कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे पिस्तूल घेऊन जात होता.
जीआरपी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.