'तुझ्याकडे कोट्यावधी रुपयांची 10 घरे आहेत...'; आमदार निवास्थानावरून मंत्री Jitendra Awhad यांचा Zeeshan Siddique ला टोला
Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडी सरकार मुंबईत आमदारांसाठी घर बांधणार असल्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षापासून सामान्य जनतेपर्यंत अनेकांनी याचा विरोध केला आहे. परंतु, आमदारांना मोफत घरे दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांकडून आकारली जाणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले होते. आता खुद्द राज्य सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांनीच आपल्याला अशी मोफत घरे नकोत, असे उघडपणे सांगितल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या संदर्भात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार जीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी ट्विट केले होते. सिद्दीकी म्हणाले होते की, ‘माझ्या वांद्रे पूर्व विधानसभेतील हजारो लोकांना घरे मिळत नसताना आणि ते हालाकीच्या परिस्थितीत राहत असताना मला महाराष्ट्र सरकारकडून घराची गरज नाही. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, आमदारांसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा जनतेची घरे बांधण्यासाठी त्याचा उपयोग करा.’

मोफत घरांच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून, त्याचा खर्च स्वतः आमदार उचलणार असल्याचे सांगितले. झीशानच्या ट्विटला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, ‘तुमच्याकडे कोट्यावधी रुपयांची 10 घरे आहेत आणि ही योजना फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आमदारांसाठी आहे, मुंबईसाठी नाही. मला वाटले की तुम्हाला चांगली समज आहे. कोणालाही मोफत घरे मिळणार नाहीत.’ (हेही वाचा: 'आमदारांच्या आधी कोरोना योद्ध्यांना घर द्या', भाजप आमदार राम कदम यांचा ठाकरे सरकारला सल्ला)

आमदारांना देण्यात येणाऱ्या घराच्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे आव्हाडांनी स्पष्ट केले. यावर महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.