Helicopter Crash In Yavatmal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Helicopter Crash In Maharashtra: शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम (Ismail Shaikh alias Munna Shaikh Ibrahim) नावाच्या केवळ 24 वर्षीय होतकरु तरुणाचा स्वनिर्मित हेलिकॉप्टर (Helicopter Crash) अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. भविष्याची स्वप्ने घेऊन आभाळभर झेपावण्यापूर्वीच नियतीने त्याच्या स्वप्नांचा त्याच्यासोबत चक्काचूर केला. यवतमाळ (Yavatmal ) जिल्ह्यातील महागाव (Mahagaon) तालुक्यात असलेल्या फलसांगवी गावचा रहिवासी असलेला शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम हा आठवी नापास होता. शिक्षणाच्या उच्च-उच्च पदव्या त्याच्याकडे नसल्या तरी त्याने बुद्धीमत्तेच्या जोरावर हेलिकॉप्टर तयार केले. हे हेलिकॉप्टर तो स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला हवेत उडवणार होता. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघात (Helicopter Accident) घडला आणि त्याचा मृत्यू झाला.

तयार केलेले हेलिकॉप्टर 15 ऑगस्टला हवेत उडविण्यासा शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम सज्ज झाला होता. मात्र, तत्पूर्वी मंगळवारी (10 ऑगस्ट) रात्री दहा वाजणेच्या सुमारास सराव सुरु होता. दरम्यान, हवेत झेपावलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा हवेतच तुटला आणि तो हेलिकॉप्टरच्या मुख्य पंख्यावर येऊन आदळला. त्यानंतर मुख्य पंखा शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम याच्या डोक्यावर आदळला. पंख्याचा फटका वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Desi Jugaad Video: वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर)

शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम याचा उपक्रम अर्धवट राहिल्याने परिसरात हळगळ व्यक्त केली जात आहे. इस्माईल हा एक पत्रा कारागिर होता. त्याने दोन वर्षे कठोर परिश्रम करुन स्वत:चे हेलिकॉप्टर तयार केले होते. लहानपनापासूनच तो पत्रा कारागिरीच्या व्यवसायात होता. त्यामुळे पत्र्यापासून विविध वस्तू बनविण्याचा त्याला सुरुवातीपासून सराव होता. या आधी त्याने अनेक प्रकारची कपाटं, कुलर अशा विविध वस्तू बनवल्या आहेत. एके दिवशी त्याला हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना सुचली आणि तो ध्यासाने पछाडला गेला. दोन वर्षे अथक परिश्रम केल्यानंतर त्याचे स्वप्न साकार झाले.

व्हिडिओ

दरम्यान, मंगळवारी रात्री सराव करत असताना त्याने हेलिकॉप्टर सुरु केले. या हेलिकॉप्टरचे इंजिन 750 अॅम्पीयरचे होते. नेहमीप्रमाणे सराव व्यवस्थित सुरु असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला. आणि घात झाला. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणारा शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम स्वप्न पूर्ण होण्याआधीच या जगातून निघून गेला. त्याच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ आणि बहिणअसा परिवार आहे.