कोविड-19 (Coronavirus) च्या ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट एक्सई (XE Variant) चे देशातील पहिले प्रकरण मुंबईमध्ये (Mumbai) आढळले आहे. बीएमसीने (BMC) नुकतेच 11वे जीनोम सिक्वेन्सिंग केले होते, त्यामध्ये हा रुग्ण आढळून आला. ही बातमी समोर आल्यानंतर देशात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले की, या नव्या प्रकाराबाबत घाबरण्याची गरज नाही. संबंधित रुग्ण गेल्या महिन्यात 2 दिवसात बरा झाला होता.
महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे शशांक जोशी म्हणाले, ‘मुंबईमध्ये XE व्हेरिएंटचे प्रकरण मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून आले होते. आता हा प्रवासी पूर्णपणे बरा झाला आहे. परंतु त्याचा जिनोमिक डेटा समोर आला आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, कोविड योग्य वर्तनाचे अनुसरण करत राहेन गरजेचे आहे.’
बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरियंटपेक्षा XE हा प्रकार 10 टक्के अधिक ट्रान्समिसिबल असल्याचे दिसते. आतापर्यंत, BA.2 हा सर्व कोविड-19 प्रकारांमध्ये सर्वात सांसर्गिक मानला जात होता. XE प्रकार हा BA.1 आणि BA.2 ओमायक्रॉन स्ट्रेनचे उत्परिवर्तन आहे, ज्याला ‘रीकॉम्बीनंट’ म्हणून संबोधले जाते. (हेही वाचा: कोरोना पुन्हा वाढणार टेन्शन! नवीन XE प्रकार Omicron BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य; WHO चा दावा)
सुरुवातीच्या अभ्यासानुसार, BA.2 च्या तुलनेत XE प्रकाराचा ग्रोथ रेट 9.8 टक्के आहे, ज्याला स्टिल्थ प्रकार देखील म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की नवीनतम म्युटेट झालेले प्रकार मागील म्युटंटपेक्षा अधिक संक्रमित असू शकतात. दरम्यान, मुंबईत बुधवारी कोरोनाव्हायरसची 51 नवीन प्रकरणे नोंदली गेली, ज्यामुळे संक्रमणाची संख्या 10,58,236 झाली, सलग दुसऱ्या दिवशी शहरात 50 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. मंगळवारी किमान 56 संसर्गाची नोंद झाली.