घरातूनच सेक्स रॅकेट चालविणा-या 56 वर्षीय गृहिणीस चारकोप परिसरातून अटक
Sex Racket Busted. (Photo Credit: PTI)

मुंबईत सेक्स रॅकेट सारखे गंभीर गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच मुंबईतील चारकोप परिसरातील एका गृहिणीने घरातच सेक्स रॅकेट (Sex Racket) चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती कामावर आणि मुलगी कॉलेजसाठी घराबाहेर पडताच ही महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी 56 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

चारकोप (Charkop) पश्चिमेच्या सेक्टर 2 मधील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये ही महिला आपल्या पती आणि मुलीसोबत राहत होती. पतीचे पार्टनरशिपमध्ये एक दुकान आहे, तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. यापूर्वी अटक आरोपी महिला विमा कंपनीमध्ये नोकरीला होती. त्यामुळे तिच्या संपर्कात अनेक जण होते. त्यामुळे कोण कसे काम करते? याचीही तिला माहिती होती. नोकरी सोडल्यानंतर, ती घरीच असे. पती आणि मुलगी घराबाहेर पडल्यानंतर,ती एकटीच घरात असे. याच दरम्यान तिने घरातूनच वेश्याव्यसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून तिने पूर्वी संपर्कात असलेल्या मुलींना याबाबत सांगितले. त्यापाठोपाठ ग्राहकांची माहिती मिळविली.

हेही वाचा- Sex Racket: पुण्यात 2 हिंदी आणि मल्याळम अभिनेत्रींचा वेश्याव्यवसाय; ग्राहक बनून पोलिसांचा छापा, डॉक्टर दलाल अटकेत

त्यानुसार तिने ग्राहकांना मुलींचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविण्यास सुरुवात केली. मुलीचा फोटो पसंत येताच ग्राहकाला घरी बोलावून, संबंधित मुलीसोबत त्याची भेट घालून द्यायची. अशा रितीने घरातील दोन बेडरूमचा वापर ती वेश्याव्यवसायासाठी करू लागली. दिवसेंदिवस हे ग्राहक वाढत गेले. ही बाब काहींच्या नजरेत पडली. आणि दक्ष नागरिकांनी याची माहिती गुन्हे शाखेला दिली.

ही बातमी मिळताच गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून नीट सापळा रचून ही महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले.