Sex Racket Busted. (Photo Credit: PTI)

हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना, पुण्यात देह विक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.सुरेश कुमार सूद (वय-74, रा. 108, किंग्ज अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे) असे या आरोपीचे नाव असून, तो दिल्ली एम्स हॉस्पिटलमधील निवृत्त डॉक्टर आहे. त्यानंतर या दोन अभिनेत्रींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

याबाबत फौजदार अनंत व्यवहारे सांगतात, ‘डॉ. सुरेश सूद हा मुंबईमधील हिंदी आणि मल्याळम चित्रपटामधील अभिनेत्रींकडून, वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती आम्हास मिळाली होती. या व्यक्तीला पकडण्यासाठी आम्ही बंडगार्डनच्या एका पंचातारांकित हॉटेलमध्ये खोट्या ग्राहकाचा सापळा रचला. त्यात सुरेश आपोआप सापडला व अखेर त्याला आम्ही ताब्यात घेतले.' याप्रकरणी फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

(हेही वाचा: धक्कादायक! पाकिस्तानी तरुणींची चीनमध्ये तस्करी; लग्नाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात भरती)

दरम्यान, नुकतेच पुण्याच्या विमान नगर भागातही हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका भारतीय महिलेबरोबर एक परदेशी मुलीची सुटका केली. याप्रकरणी विशाल नर्मल (26) आणि कृष्णा प्रकाश नायर (23) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यातही कोरेगाव पार्क परिसरातील जी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी असेच एक सेक्स रॅकेट उध्वस्त केले होते.