भाजप आमदार चरण वाघमारे यांच्यावर महिला पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल
Bjp Mla Charan Waghmare | (Photo credit : Facebook)

भाजप आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) यांच्यासह चौघांविरोधात तुमसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार चरण वाघमारे आणि इतरांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molestation of Women Police Officer) केल्याचा आरोप आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन भा.दं. स. कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झाल्याचे वृत्त नाही. आमदार वाघमारे हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करतात.

महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तुमसर बाजार समिती येथे कामगारांसाठी असलेले सुरक्षा किट वाटप सुरु होते. 16 सप्टेंबर या दिवशी रात्री उशीर पर्यंत हे वाटप सुरु होते. या वाटपावेळी अनेक महिला, पुरुष कामगारांनी गर्दी केली होती. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी गर्दीमध्ये एक गरोदर महिलाही उपस्थित होती. या महिलेस तुम्ही घरी कशा जाणार असे संबंधित महिला अधिकाऱ्याने विचारले. या वेळी भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषा वापरली. यावरुन संबंधित महिला अधिकारी आणि जिभकाटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या चकमकी दरम्यान महिला अधिकाऱ्याने जिभकाटे यांना असभ्य भाषेचा वापर करु नका, अशी विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला अर्वच्च भाषा वापरत शिविगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, भाजप आमदार चरण वाघमारे हे तिथे आले. त्यांनीही हे प्रकरण सोडविण्याऐवजी महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरले. (हेही वाचा, पेढे घ्या पेढे! बिहारी लोक राहतात इकडं, पोरं होतात तिकडं; भाजप आमदाराचा वादग्रस्त वक्तव्यातून 'धस'मुसळेपणा)

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत महिला अधिकाऱ्याने आरोप केला आहे की, अनिल जिभकाटे यांनी आपला (महिला अधिकारी) हात पकडून धक्का दिला. दरम्यान, या प्रकारानंतर महिला अधिकाऱ्यांनी बुधवारी (18 सप्टेंबर 2019) सायंकाळी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार नोंदवली. महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 353, 354, 472, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, आमदार चरण वाघमारे यांनीही पोलीसांना एक निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणा अद्याप कोणालाही अटक झाली नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.