Woman Goes Into Labour Onboard ST Bus: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. चालक दलाने तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. ही घटना शनिवारी रायगड जिल्ह्यातील कोलाड गावाजवळ घडली. रुद्रोली गावातील रहिवासी असलेल्या सुशीला रवी पवार या दुपारी वडखळ येथून पनवेल-महाड बसमध्ये चढल्या. प्रवासादरम्यान त्यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्या. बसचालक देविदास जाधव आणि वाहक भगवान परब यांनी तात्काळ बस कोलाड येथील आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली आणि गर्भवती महिलेला तेथे दाखल केले.
बसच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई केल्यामुळे महिलेला वैद्यकीय उपचार मिळाले आणि तिची प्रसूती सुरळीत झाली. खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असून आगामी गणेशोत्सव संपेपर्यंत या रस्त्यावरून अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. (हेही वाचा - First Female MSRTC Bus Driver: कौतुकास्पद! माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक; सिन्नर ते नाशिक बस चालवून रचला इतिहास, Watch Video)
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MSRTC कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) 4% ने वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 9 कोटींचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे. एमएसआरटीसी कर्मचारी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत होते जेणेकरून त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळतील. ही मागणी राज्य सरकारने धुडकावून लावली असली तरी, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
तथापी, MSRTC कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता मिळत होता. आता तो 38% पर्यंत वाढवला जाईल. महामंडळ ही स्वतंत्र संस्था असली तरी अधिकारी आणि इतर कर्मचार्यांच्या पगाराच्या बिलांसाठी राज्य सरकार त्यांना आर्थिक मदत करते, असे एका वरिष्ठ सीएमओ अधिकाऱ्याने सांगितले.