CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 9 आणि 10 जानेवारी रोजी औरंगाबाद, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या 4 जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती. दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लातूर (Latur) येथे नवीन उदगीर (Udgir) जिल्हा निर्मितीची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे लावू धरली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या विभागीय बैठकीत सूचना दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवीन जिल्हा निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या उदगीर येते राहणाऱ्या नागरिकांसाठी आशेचे किरण निर्माण झाले आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई या जिल्ह्याची निर्मिती करावी तर, लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करावी अशी मागणी गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. तसेच आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्ह्याची लवकरच निर्मिती करू असे आश्वासन दिले आहे. सध्या उदगीर जिल्हा निर्मितीची हालचाल सुरुवात झाल्याने आता अंबाजोगाईची मागणीला अधिक जोर धरण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

महाराष्ट्रातील काही जिल्हे मोठे असल्याने जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गावात पोहचण्यासाठी अनेक अडचणी येतात. तसेच विकासाच्या कामाची गती वाढवण्यासाठी लहान जिल्ह्यांचा योग्य पर्याय आहे. यासाठी केवळ मराठवाड्यातच नाहीतर विदर्भातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. विदर्भातील चंद्रपूर, दुर्गम असा गडचिरोली, बुलडाणा, अमरावती असे भौगोलिकदृष्ट्या मोठे जिल्हे आहेत. त्यामुळे विकासाला अनेक मर्यादा येतात. म्हणूनच विदर्भात ब्रह्मपुरी, चिमूर, अहेरी, काटोल, अचलपूर, पुसद, आष्टी, खामगाव असे नवे ११ जिल्हे निर्माण करावेत अशी मागणी सातत्यानं केली जातीय.