बीजेपी (Photo Credits: IANS)

भाजपच्या (BJP)राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी नड्डा यांची निवड झाल्यानंतर मुबई प्रदेशाध्यक्षपदी ( BJP Mumbai President)नवा चेहरा पाहायला मिळणार आहे, अशीही चर्चा सर्वत्र रंगली आहे. सध्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यावर सोपण्यात आली होती. मात्र, मंगल प्रभात लोढा यांना हटवण्याची मागणी पक्षातील अनेक नेते करत असल्यामुळे अध्यक्षपदी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्या नावाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यासाठीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी 6 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. भाजप पक्षातून मंगल प्रभात लोढा यांना विरोध दर्शवला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचा नेमका अर्थ काय? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, संध्याकाळी सहा वाजता प्रदेश कार्यालयात मुंबईतील आमदार, नगरसेवकांना पाचारण करण्यात आले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.या बैठकीत ‘मुंबई भाजप’ला नवे प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलारांसोबत अतुल भातखळकर, पराग आळवणी यांचीही नावे चर्चेत आहेत. हे देखील वाचा-जे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भाजप नेते अमित शाह यांची मोदी सरकार मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी पडल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नव्या व्यक्तीकडे द्यावी, अशी विनंती अमित शाह यांनी केली होती. भाजपा पक्षामधील ' एक व्यक्ती एक पद' या धोरणानुसार आता अमित शाह यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी आता जे. पी नड्डा यांच्या खांद्यावर सोपण्यावर आली आहे.