Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंडरवर्ल्डशी निगडीत लोकांसोबत कवडीमोल दराने जमीन खरेदी केल्याचं म्हटलं आहे. त्याचं प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी देखील 'बॉम्ब' फोडण्याची भाषा करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचे फटाके फुसके निघाल्याचं म्हणत टीका केली आहे. नवाबांनी आरोप फेटाळत आता अंडरवर्ल्डचा विषय निघालाच आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्याच एका व्यक्तीला हाताला धरून संपूर्ण शहर कसं वेठीस धरलं होतं याचा खुलासा उद्या (10 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 10 वाजता करणार असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Devendra Fadnavis यांचा Nawab Malik यांच्यावर हल्लाबोल; कुर्ला मध्ये अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा दावा.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नवाबांवर जमीन खरेदी प्रकरणामध्ये केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. ही जमिन खरेदी नियमानुसारच झाली आहे. सलीम पटेल किंवा सरदार शाहवली खान सोबत काही थेट संबंध नसून केवळ गोवावाला क्म्पाऊंड मध्ये भाडेकरू असताना मालकी हक्क देण्यासाठी आवश्यक पैसे दिले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आजही गोवावाला कम्पाऊंडमध्ये सरदार वली खानचं घर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

62 वर्षांच्या आयुष्यात आणि 26 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये अशाप्रकारचे आरोप कधी झाले नाही. पण कोणत्याही चौकशी यंत्रणांकडे कागदपत्र दिले तरी घाबरत नसल्याचं नवाब म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खोटं तरी नीट बोलायचं होतं असे सांगत त्यांची खिल्ली उडवली आहे. आज फटाके  फुटले नाहीत पण उद्या हायड्रोजन बॉम्ब ब्लास्ट होईल असं त्यांनी म्हटलं आहे.