Param Bir Singh आहेत कुठे? देश सोडून फरार झाल्याच्या चर्चांना उधान
Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करुन खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या गायब आहेत. परमबीर सिंह (Param Bir Singh) नेमके आहेत तरी कुठे हा सवाल तपास यंत्रणांसह अनेकांना पडला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) द्वारा अनेक वेळा समन्स बजावले गेले असूनही परमबीर सिंह नेमके आहेत तरी कोठे याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे ते अटकेच्या भीतीने देशाबाहेर पळून तर गेले नाहीत ना? अशी शंका व्यक्त होते आहे. परमबीर सिंह हे देश सोडून गेले (Param Bir Singh Fled the Country) असावेत अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याला अद्याप पुष्टी मिळाली नाही.

अँटिलिया स्फोटकं प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने परमबीर सिंह यांना समन्स बजावले आहे. एकदा नव्हे तर अनेकदा हे समन्स बजावण्यात आले आहे. तरीही परमबीर सिंह हे चौकशीला सामोरे गेले नाहीत. अँटिलिया स्फोटकं प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वप्रथम एपीआय सचिन वाझे यााल अटक करण्यात आली. पुढे याच वाझेला महाराष्ट्र पोलीस दलातून सुरुवातीला निलंबीत आणि पुढे बडतर्फ करण्यात आले. वाझे याच्यावर कारवाई करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या माहितीसाठी एनआयएने सर्वप्रथम परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. (हेही वाचा, Param Bir Singh यांच्या विरूद्ध ठाणे पोलिस स्थानकातील नोंद खंडणीच्या गुन्ह्यांच्या तपास CID करणार)

अँटिलिया स्फोटकं प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुढे आले होते की, सचिन वाझे हा थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होता. याबाबत एनआयएने नुकतेच एक चार्जशीट दाखल केले. त्यात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याचे पुरावा मिळाल्याचा उल्लेख आहे. प्रसारमाध्यमांनी एएनआयच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, एनआयएने परमबीर सिंह यांना ऑगस्टमध्येही समन्स बजावले. तसेच, एनआयएचे अधिकारी परमबीर सिंह यांच्या हरियाणा राज्यातील चंदीगड आणि रोहतक येथील निवासस्थानीही जाऊन आले. परंतू, तेथेही ते सापडले नाहीत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.