'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रातील सर्व नैसर्गिक आपत्ती- पाऊस (Heavy Rains), पूर (Floods) आणि कोरोना विषाणूसाठी (Coronavirus) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM  Uddhav Thackeray) यांचा पायगुण जबाबदार आहे, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी केली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री हे पांढऱ्या पायाचे तर नाहीत ना, हे एकदा तपासून पाहावे असेही नारायण राणे म्हणाले आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी नारायण राणे असेही म्हणाले की, जर का राज्य योग्य प्रकारे चालवू शकत नसाल तर ते आम्हाला द्या, आम्ही वेटिंगवर आहोत. असे म्हणत नारायण राणे देवेंद्र फडणवीसांकडे बघून हसू लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल तळीये आज चिपळूणला भेट दिल्यानंतर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. यानंतर पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच राज्यावर संकटे येत आहेत. मुख्यमंत्री आले आणि येताना कोरोना विषाणू घेऊन आले. त्यानंतर आता पाऊस आणि पूर आले.

चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर नारायण राणे म्हणाले की मुख्यमंत्री येथे आले आहेत, त्यांनी पाहणी केली व ते आढावा घेत बसतील. मी येथून दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींना तातडीने अहवाल देईन. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, इथल्या लोकांना दिलासा कसा द्यायचा, त्यांना त्यांच्या पायावर कसे उभे करायचे हे आम्ही पाहू व त्यांच्या अडचणी दूर करू. हे आमचे लोक आहेत, आमच्या कुटुंबातील लोक आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत याची मी काळजी घेईन.

ते पुढे म्हणाले की चिपळूणमधील परिस्थिती भयानक आहे. इथल्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना विम्याचे पैसे आगाऊ हवे आहेत. सरकारने झालेल्या नुकसानीची भरपाई करावी आणि ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांचे पुनर्वसन करावे. केंद्राच्या विविध योजनांतर्गत व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. (हेही वाचा: Mahad, Raigad Landslide: तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार- नारायण राणे)

नारायण राणे पुढे म्हणाले की, चौथ्या दिवशी मुख्यमंत्री कोकणात का आले? कारण माझा फॅक्स काल संध्याकाळी 6.30 वाजता आला. मी कोकणात येत आहे, मी ही माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कोकणचा कार्यक्रम निश्चित केला.