Sanjay Raut | (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी जनतेला सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन केले होते. नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, डीडी नॅशनलवर (DD National) पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी  (Prime Minister's National Relief Fund) जाहीरात केली जात आहे. मग राज्य सरकारला डीडी सह्याद्रीवर ( DD Sahyadri) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister's Relief Fund) जाहीरात करायला काय हरकत आहे? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये सिनेकलाकार, खेळाडू, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यात मदत करु इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात इच्छुकांनी सढळ हाताने मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, पतंप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर दर 2-3 मिनिटांनी जाहीरात दाखवली जात आहे. मग राज्य सरकारला डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीरात करायला काय हरकत आहे, अशा आशायाचे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या सर्वाधिक चाचण्या; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

संजय राऊत यांचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 7 हजार 529 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 242 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 642 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1761 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.