कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी केवळ 15 दिवस द्या; मुंबई मधील Medical Education & Research चे खाजगी डॉक्टरांना आवाहन
Doctors | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशावर ओढावलल्या कोरोना व्हायरस संकटाचा प्रभाव महाराष्ट्र (Maharashtra) राज्यावर सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर राज्य, शहरांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे निश्चितच मुंबईकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत मुंबईतील खाजगी डॉक्टरांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे दवाखाने बंद असलेल्या डॉक्टरांना कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी 15 दिवस देण्याचे आवाहन मुंबईच्या (Mumbai) मेडिकल एज्यकेशन आणि रिसर्च (Medical Education & Research) चे डिरेक्टर यांनी केले आहे. विशेष म्हणजे 55 वर्षाखालील वय असलेल्या आणि रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार नसलेल्या डॉक्टरांना हे आवाहन करण्यात आले आहे. तसंच यासाठी डॉक्टरांना मोबदला देण्यात येईल आणि रुग्णसेवे दरम्यान सुरक्षा कीटही पुरवण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे डिरेक्टर यांनी दिली आहे.

मुंबईतील कोरोना बाधितांची सातत्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर्स, आरोग्य सेवकांची गरज भासणार आहे. हा विचार करूनच खाजगी डॉक्टरांना हे आवाहन करण्यात येत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या सर्वांनाच कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. (मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

ANI Tweet:

सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 15525 इतकी झाली असून त्यापैकी 2819 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 12089 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच 9945 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तसंच ही रुग्णसंख्या दिवसागणित वाढत आहे.