Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबई - दिल्ली (Mumbai - Delhi) प्रवास करणार्‍या राजधानी एक्सप्रेसच्या (Rajdhani Express) प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) आता अजून एक खूषखबर दिली आहे. राजधानी एक्सप्रेसला आज (24 ऑगस्ट) पासून पुश-पूल (Push–Pull Train) पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवासाचा कालावधी आता एका तासाने कमी होणार आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान राजधानी एक्सप्रेस चालवली जाते. आता या एक्सप्रेसचा वेग वाढवला जाणार असल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे. आता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार

मुंबई - दिल्ली दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस आत्तापर्यंत 1384 हे अंतर 16 तासामध्ये कापत होती. मात्र आजापासून पूल पुश पद्धतीने राजधानी एक्सप्रेसच्या मागे आणि पुढे 6000 हॉर्स पॉवरचे इंजिन जोडण्यात आल्याने गाडीचा वेग वाढणार आहे. तसेच ब्रेक तात्काळ कार्यान्वित करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे.

डिसेंबर 2018 मध्ये राजधानी एक्सप्रेस पूल पुश पद्धतीने चलवली जावी यासाठी ट्रायल रन घेण्यात आली होती. त्याच्या यशस्वी चाचणी आणि आवश्यक परवानग्या मिळाल्या नंतर आता राजधानी अधिक वेगवान होण्यासाठी सज्ज झाली आहे. आता राजधानी एक्सप्रेसनंतर मुंबई -दिल्ली जाणारी ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसचाही वेग वाढवण्यासाठी त्याला पुश पूल पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी दिल्लीला मध्य रेल्वे मार्गावरून जाणार्‍या सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस पुश - पूल पद्धतीने चलवली जात आहे.