Western Railway (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारतात पसरत चाललेली कोरोना व्हायरसने आणखी जम बसवू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्रवासी पर्यटकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने (Western Railway) देखील महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे तिकीट बुकिंग करण्यासाठी परदेशी नागरिकांची तसेच कोरोना संक्रमित राज्यांतून आलेल्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना कोरोना आजाराच्या तपासणीनंतरच रेल्वे तिकिट दिले जाणार आहे.

आतापर्यंत भारतात 115 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्रात 38 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमिवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. म्हणून पश्चिम रेल्वेनेही सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार

यापुढे तिकीट बुकींग करताना परदेशी नागरिकांना कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे. टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना तिकीट मिळणार आहे. तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांची थेट विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येणार आहे.

यासोबत कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये पश्चिम रेल्वेच्या सर्व डब्यांची साफसफाई सुरु करण्यात आली आहे. तसेच डब्यांत प्रत्येक हँडल्स, खिडक्या, दरवाजे, टेबल अशा सर्व गोष्टी सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच गाड्यांमधील प्रत्येक सीट सॅनिटाझरने स्वच्छ करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरातही फवारणी करण्यात येत आहे.

त्याचबरोबर प्रवाशांना मास्क वापरण्यास देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे.