पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या येत्या 30 नोव्हेंबर रोजी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. एका बिझनेस समिटसाठी त्या मुंबईत येत असल्याचे समजते. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वाही आहेत. त्यामुळे हा दौरा आणि या भेटीला महत्त्व आले आहे. या दौऱ्यात ममता 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर इतका कालावधी मुंबईत असतील. सध्या त्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती मिळालेल्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे सध्या त्या पश्चिम बंगाल बाहेरही त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यातही त्यांनी पक्षविस्ताराचा प्रयत्न सुरु केला आहे. याशिवाय काँग्रेसमधील नाराज नेत्यांनाही त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश घ्यायला सुरु केला आहे. बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांचे काँग्रेस पक्षासोबत संबंध बिघडले असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Ganeshotsav 2021: गणेशोत्सवानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी दिल्या मराठीमधून शुभेच्छा)
ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्या काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील अशी शक्यता होती. या भेटीबाबत विचारले असता त्या प्रसारमाध्यमांवरच भडकल्या. पाठीमागील दौऱ्यात त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, सोनिया गांधी यांच्या व्यग्रतेचे कारण देत आपण त्यांची भेटीसाठी वेळ मागितली नसल्याचे ममता यांनी म्हटले आहे.
ट्विट
I will meet Maharashtra CM Uddhav Thackeray and Sharad Pawar Ji during my visit to Mumbai on 30th Nov-1st Dec: West Bengal CM Mamata Banerjee
— ANI (@ANI) November 24, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेकदा ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीतील यशाचे जाहीर कौतुक केले आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी गणेशोत्सव काळात मराठीतूनही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्या भविष्यात महाराष्ट्र प्रवेशाचा विचार करतील असे संकेत होते. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.