प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी कोरोनाचे नियम देखील अधिक कडक करण्यात आले आहे. दर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यात आता येत्या 15 मार्चपासून नाशकात लग्नसमारंभास (Wedding Functions) सक्त मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा प्रशासनाने कोरोना संबंधीचे नवे नियम लागू केले आहेत. जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध लागू करण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश असणारं पत्रक जारी केलं आहे.हेदेखील वाचा- मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही- बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल

या नव्या निर्बंधांमध्ये 15 मार्चपासून लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स आणि अन्य ठिकाणी लग्न समारंभ तसेच इथर कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत लग्नसमारंभांसाठी मंगल कार्यालय मालकांनी हॉल देऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे.

खाद्यगृहे, परमिट रुम किंवा बार सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, बारमध्ये आसन क्षमतेच्या 50% ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय, होम डिलेव्हरीही रात्री दहापर्यंत सुरु राहील.

धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल. तसेच शनिवार आणि रविवार मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान 'मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही', असे म्हटले आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माहिती दिली.