Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह 7 राज्यांना अवकाळीचा इशारा, विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली
Weather Forecast | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain Alert In Maharashtra) होईल, असं हवामान खात्याने (Weather Update) सांगितलं आहे. विदर्भासह (Vidharbha) मराठवाड्यातील (Marathwada) थंडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगाल उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: वर्षाअखेर आणि नववर्ष प्रारंभी वरुणराजाची कृपा, पर्जन्यवृष्टी आणि हवामानातही पाहायला मिळणार चढ-उतार)

सध्या महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडील राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंगळवार आणि बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.