
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी 12 मार्च ला केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. 'शिवसेनेला फसवलं ही भाजपची चूक झाली' असे विधान केल्याचे सर्व प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत होते. मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे मुनगंटीवार यांनी सांगत यावर स्पष्टीकरण दिले आहे. "आम्ही मित्रपक्षाला आम्ही कधीही फसविले नाही आणि भविष्यातही तसे कधी होणार नाही", असे स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिले.
गुरुवारी अर्थसंकल्पात मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावर उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाल्या. त्यावर स्पष्टीकरण देत "राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे माझे वक्तव्य आहे. ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाले, त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या नाहीत. एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे" असे मी म्हणालो, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. हेदेखील वाचा- शिवसेनेला फसवलं, भाजपची चूक झाली; सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट कबुली
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने ‘भाजपने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली’, असे वक्तव्य केले होते. त्यावर दिलेल्या उपहासात्मक उत्तराचा विपर्यास केला गेला असेही ते पुढे म्हणाले.
शिवसेनेला (Shivsena) विधानसभा काळात दिलेलं मुख्यमंत्री पदाचं वचन न पाळता आमच्या (BJP) कडून फसवणूक झाल्यानेच आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीला (NCP) झाला, शिवसेनेला फसवणं ही आमची चूकच पण ही चूक येत्या काळात सुधारू अशी स्पष्ट कबुली राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली होती. राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत मुनगंटीवार (गुरुवारी) बोलत होते.