मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

मा. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे वचन दिले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. याच वचनाची झालेली पूर्ती साजरी करण्यासाठी आज शिवसेनचा (Shiv Sena) वचनपूर्ती सोहळा आयोजित केला होता.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केले, ते म्हणाले, 'आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचे वचन घेतले होते, आता मैदानावर उतरल्यावर मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडेन. ही माझी वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेला टाकलेले पहिले पाऊल आहे. ज्या परिस्थितीत सरकार स्थापन झाले त्यामुळे शिवसेनेवर आरोप झाले. मात्र भाजपने ज्या प्रकारे आमच्याशी खोटेपणा केला, त्यानंतर विरोधकांशी मी हातमिळवणी केली मात्र आमचा भगवा रंग बदलला नाही, आम्ही हिंदुत्व सोडले नाही.'

पुढे त्यांनी जनतेचे आभार मानले, 'ज्या लोकांनी शिवसेनेसाठी बलिदान दिले त्यांच्यासमोर मी नतमस्तक आहे. आज हे शिवसैनिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. आज माझ्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा विश्वासघात होणार नाही असा शब्द मी देतो.'

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी बाळासाहेबांसोबत काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते, आज उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला गेला तसेच रश्मी ठाकरे यांची ओटी भरण्यात आली. आज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Jayanti) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) महाअधिवेशन पार पडले. यावेळी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आता नुकतेच शिवसेनचा वचनपूर्ती सोहळाही पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी शिवसैनिक व जनेतला संबोधित केले. (हेही वाचा: राज ठाकरे म्हणतात 'मी मराठी आणि हिंदू सुद्धा'; मनसे येत्या 9 फेब्रुवारीस आझाद मैदानावर काढणार मोर्चा)

मुंबईच्या बीकेसी परिसरात हा सोहळा पार पडला. शिवसेनचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सत्काराने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपटसृष्टीमधील कलाकारांचा 'रंगारंग' हा कार्यक्रम पार पडला.