हिंगणघाट (Hinganghat) येथे पेट्रोल (Petrol) टाकून जाळलेल्या पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. पीडित तरुणीचा आज (सोमवार, 10 फेब्रुवारी 2020) पहाटे 6.55 वाजता मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यावर तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. दरम्यान, आमच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आरोपीला आमच्या स्वाधीन करा अथवा त्यालाही जिवंत जाळा. त्याशिवाय आमचे समाधान होणार नाही. तसेच, आमच्या मुलीच्याही आत्म्याला शांती मिळणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
पीडितेचे काही नातेवाईक हे शवविच्छेदन सुरु असलेल्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर काही नातेवाईक पीडितेच्या मूळ गावी दाखल झाले आहेत. पीडितेच्या नातेवाईकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडितेच्या कुटुंबीय अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी सरकारकडे करत आहेत. आमच्यावर जे संकट कोसळले आहे, ते शब्दात सांगता येण्यासारखे नाही. आम्हाला काही नको फक्त आरोपीला आमच्या ताब्यात द्या. किंवा आमच्या मुलीला जशा त्याने वेदना दिल्या तशाच वेदना त्यालाही द्या. त्याला आमच्या मुलीसारखेच जाळून मारा, अन्यथा आम्ही पीडितेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
पीडिता ही हिंगणघाट शहरात असलेल्या तुळसकर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती दारोडा ते हिंगणघाट असा प्रवास नोकरीनिमित्त नियमीतपणे करत असे. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने पीडितेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. चार फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली होती. एकतर्फी प्रेमातून आरोपींने हे कृत्य केले होते. (हेही वाचा, वर्धा: हिंगणघाट येथे अंगावर पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित तरुणीचा मृत्यू)
दरम्यन, पीडितेवर नागपूर येथील रुग्णालयात पाठीमागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु होते. पाठिमागील सात दिवसांपासून ती या रुग्णालयात दाखल होती. तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. रविवारी तिच्यावर चौथ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरुवातीला तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, पुढे तिच्या शरीराने औषधं आणि उपचार यांना प्रतिसाद देणे हळूहळू बंद केले. रविवारी मध्यरात्रीपासून तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. तिचे ब्लडप्रेशरही कमी होत गेले. त्यानंतर सकाळी तिला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.