![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/02/burn-380x214.jpg)
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथे अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जाळलेल्या पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. या तरुणीचा आज (सोमवार, 10 फेब्रुवारी 2020) पहाटे 6.55 वाजता मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काल रात्रीपासून पीडितेचा रक्तदाब खालावरत होता. तिच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक बारीक लक्ष ठेऊन होते. मात्र, आज सकाळी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. गेले 7 दिवस सुरु असलेल्या संघर्षाची दु:खद अखेर झाली. पीडितेचे पार्थिव शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आले असून, शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
पीडितेवर नागपूर येथील रुग्णालयात पाठीमागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु होते. पाठिमागील सात दिवसांपासून ती या रुग्णालयात दाखल होती. तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. रविवारी तिच्यावर चौथ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरुवातीला तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, पुढे तिच्या शरीराने औषधं आणि उपचार यांना प्रतिसाद देणे हळूहळू बंद केले. रविवारी मध्यरात्रीपासून तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. तिचे ब्लडप्रेशरही कमी होत गेले. त्यानंतर सकाळी तिला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
पीडिता ही हिंगणघाट शहरात असलेल्या तुळसकर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती दारोडा ते हिंगणघाट असा प्रवास नोकरीनिमित्त नियमीतपणे करत असे. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने पीडितेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. चार फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली होती. एकतर्फी प्रेमातून आरोपींने हे कृत्य केले होते.
आरोपीलाल कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. निर्भया प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहू नये. आरोपीला त्वरीत शिक्षा व्हावी अशी भावना पीडितेच्या वडीलांनी व्यक्त केली आहे. तर, विविध राजकीय पक्षाच्या नेते प्रवक्ते आणि नेत्यांनीही आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे. (हेही वाचा, पुणे: अॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत केला व्हिडिओ शूट, आरोपीला पोलिसांकडून अटक)
दरम्यान, या प्रकरणात केवळ आरोपी विकेश नागराळे हा एकटाच सहभागी आहे की, त्याला इतरही कोही लोक मदत करत होते, याचा तपास करुन इतरही आरोपींना शिक्षा ठोठावली जाईल यासाठी सरकार प्रयत्न करेन. या प्रकरणाचा खटला लढण्यासाठी अतिशय ज्येष्ठ आणि चांगले वकील आपण दिले आहेत, अशी माहिती पीडितेच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे.