Voter ID Aadhar Linking Drive: आता घरबसल्या तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करा, जाणून घाय स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

भारत निवडणूक आयोगाने आजपासून अनेक राज्यांमध्ये मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करण्याची मोहीम सुरू करत आहे. आता महाराष्ट्रामध्ये हा महिमेला सुरुवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करण्याच्या उद्देशाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कार्ड एकमेकांशी जोडल्याने बनावट मतदार ओळखपत्र काढून टाकण्यास मदत होईल.

तसेच अनेक लोक एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र ठेवतात आणि वाटेल तिथे मतदान करतात, परंतु जर मतदार ओळखपत्र आधारशी जोडले गेले तर दुसऱ्या पत्त्यावर बनवलेले ओळखपत्र अवैध ठरेल. त्यामुळे बोगस मतदार ओळखपत्र काढणे सोपे होणार आहे. त्यामुळे निवडणूक आणि मतदानात पारदर्शकता येईल व देशात खरे मतदार किती आहेत, हेही समजेल.

महाराष्ट्रातील लोक पुढील काही सोप्या स्टेप्स वापरून घरबसल्या आपले मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करू शकतात-

  • सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) - nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पोर्टलवर लॉग इन करा आणि मुख्यपृष्ठावर मतदार यादीमध्ये ‘सर्च’ चा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून किंवा तुमचा EPIC क्रमांक आणि राज्य प्रदान करून तुमचे मतदार कार्ड शोधा.
  • डाव्या बाजूला फीड आधार क्रमांक सांगणारा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक विंडो उघडेल जिथे तुम्हाला तुमचा आधार तपशील योग्यरित्या आणि काळजीपूर्वक प्रविष्ट करावा लागेल.
  • आता, तपशील सबमिट करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल पत्त्यावर प्राप्त झालेला OTP देऊन तुमची ओळख प्रमाणित करा.
  • OTP टाकल्यानंतर सबमिट वर टॅप करा.

अशा सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर तुमचे मतदार ओळखपत्र तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जाईल. यावर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. (हेही वाचा: 17 वर्षांवरील भारतीय नागरिक आता अ‍ॅडव्हान्समध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र; ECI ची माहिती)

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या मतदार ओळखपत्र आधार लिंकिंग मोहिमेची औपचारिक घोषणा केली. मतदार ओळखपत्र आधार लिंकिंग मोहीम महाराष्ट्रात आज, सोमवार, 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्याही अडचणींचा सामना न करता, लोकांना त्यांची मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी सुरळीतपणे लिंक करण्यात मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिबिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक आजपासून शिबिरांना भेट देऊ शकतात.