Virtual Kidnapping in Maharashtra: सायबर पोलिस विभागाकडून पालकांना इंटरनेटवरील बदमाशांपासून दूर राहण्याचं आवाहन
Cyber Crime | Photo Credits: Pixabay.com

आजकाल सामाजिक गुन्हांसोबतच सायबर गुन्हेगारीदेखील वाढत आहे. इंटरनेटवर युजर्सची दिशाभूल करून, त्यांची फसवणूक करून पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. आता महाराष्ट्र पोलिस दलाच्या महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber)या विभागाकडून 'virtual kidnapping'याबाबत सजग राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. virtual kidnapping मध्ये पालकांना काही टेक्नॉलॉजिकल आणि सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरून असं भासवलं जात की त्यांच्या मुलांचं किडनॅपिंग झालं आहे. दरम्यान त्याच्यामागे पैसे उकळण्याचा हेतू असू शकतो.

महाराष्ट्रामध्ये सायबर सेलकडून अशाप्रकारे virtual kidnapping बाबत सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरीही अद्याप राज्यात अशाप्रकरची घटना समोर आल्याचं वृत्त नाही. त्यामुळे अगदीच घाबरून जाण्याची गरज नाही.

टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेकदा स्पूफ कॉल केले जातात. मॉर्फ इमेज वापरून घरात एकट्या राहणार्‍या मुलांच्या पालकांना लक्ष्य केले जाते. असे देखील सायबर क्राईमच्या अधिकार्‍याने सांगितले आहे. ते मुलाशी ऑनलाइन मैत्री करतात आणि त्याला किंवा तिला फोन कॉलमध्ये येऊ नयेत म्हणून पुरेशी खबरदारी देखील घेतात.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावरून डाऊनलोड केले जातात ते मॉर्फ करून खोट्या किडनॅपिंग़साठी वापरतात. मुलांचा आणि पालकांचा एकमेकांशी संवाद होऊ शकत नसल्याने अनेकदा घाबरून पटकन पालकही या फसव्या व्युहचक्रामध्ये अडकतात.

पालकांनीही मुलांच्या ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. काही संशयास्पद वाटल्यास नजिकच्या पोलिस स्टेशनची मदत घेणं गरजेचे आहे. तसेच किडनॅपिंग कॉल कुठून आले आहेत त्याची देखील तपासणी करणं आवश्यक आहे. कुणावरही आंधळा विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.