महाबळेश्वरमध्ये उद्योगपती Anil Ambani व कुटुंबियांकडून महामारी निर्बंधांचे उल्लंघन; प्रशासनाने केली मोठी कारवाई
Anil Ambani | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्रामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक अनिल अंबानी (Anil Ambani) सध्या महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) आहेत. याठिकाणी महामारी निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. अनिल अंबानी पत्नी टीना आणि दोन मुलांबरोबर बर्‍याच दिवसांपासून महाबळेश्वरच्या गोल्फ कोर्समध्ये फिरताना दिसत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने गोल्फ मैदान सील केले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संसर्गग्रस्त राज्य आहे. याठिकाणी 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू आहेत.

महाराष्ट्रामध्ये सध्या दररोज कोरोनाची 50 ते 60 हजारादरम्यान प्रकरणे आढळत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व कामांवर बंदी आहे. राज्यात लॉकडाउनसारखे निर्बंध जाहीर केले गेले आहेत व याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सूत्रांनी सांगितले की अलीकडेच अनिल अंबानी महाबळेश्वरच्या गोल्फ कोर्समध्ये फिरताना दिसले आहेत. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय 15 दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये आहेत. डायमंड किंग समजले जाणारे प्रसिद्ध उद्योजक अनुप मेहता यांच्या बंगल्यात ते राहत आहे. अनिल अंबानी यांचे कुटुंब दररोज सकाळी आणि संध्याकाळी गोल्फच्या मैदानात फिरायला जात होते. ते तिथे फिरत असल्याची बातमी सार्वजनिक झाल्यानंतर स्थानिक लोकही येथे येऊ लागले व त्यामुळे गर्दी वाढू लागली.

त्त्यानंतर आता, सद्य निर्बंधामध्ये जर क्लबने लोकांना सकाळी किंवा संध्याकाळी याठिकाणी फिरायला येण्यास मनाई केली नाही तर, महामारी व्यवस्थापन कायदा, आयपीसी आणि साथीच्या आजारांच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा महाबळेश्वर परिषदेच्या मुख्य अधिकारी पल्लवी पाटील यांनी दिला. (हेही वाचा: Covid19 Cases in Maharashtra: महाराष्ट्रातील कोविड-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी)

पाटील म्हणाल्या की, अनिल अंबानी यांच्या कुटुंबातील काही सदस्य मैदानात फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर आम्ही मैदानाचे मालक 'द क्लब' ला नोटीस बजावली आहे.  तेथे लोकांना सकाळ किंवा संध्याकाळी फिरायला येण्यापासून रोखण्याच्या सूचना त्यांना दिल्या. नोटीस बजावल्यानंतर हे मैदान बंद करुन लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.