Vinayak Mete Passes Away: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातानंतर विनायक मेटे यांना मदतीसाठी तास गेला आणि होत्याचं नव्हतं झालं; सहकार्‍याची माहिती

बीड (Beed) कडून मुंबई-पुणे एक्सप्रेस (Mumbai Pune Expressway) वरून येत असताना आज सकाळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा जबर अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान मेटे यांच्यासोबत प्रवास करत असणार्‍या एकनाथ कदम यांनी मीडीयाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यासाठी एका तासाचा काळ गेला. त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही आणि यामध्येच त्यांना प्राण गमवावे लागले.

एकनाथ कदम यांनी अपघाताची माहिती देताना पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. ट्रकने कट मारल्याने त्याच्या बंपरमध्ये गाडी अडकून ती काही मीटर खेचून पुढे गेली. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एकनाथ कदम यांच्या माहितीनुसार, अपघातानंतर ते मेटेंशी बोलत होते त्यांना प्रतिसाद मिळत होता. मदतीसाठी ते 100 नंबर वर संपर्क करत होते पण फोन उचलला गेला नाही. रस्त्यावरील गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण वेळेत मदतीला कोणती गाडी थांबली नाही. अशामध्ये त्यांना हॉस्पिटला नेण्यात उशिर झाला.

मेटे हे मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये येत होते. त्यांच्या ड्रायव्हर आणि सहकार्‍याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.