
राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना, दि. 1.एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाहन करमाफी (Vehicle Tax Exemption) देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी याबाबत ही माहिती दिली. राज्यामध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांचा दि. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी देण्याचा म्हणजे, सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड-19 पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने दिनांक 25 मार्च, 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केली होती. सदर लॉक डाऊन 31 मे 2020 पर्यंत सुरू होती. त्यानंतर राज्य शासनाने 31 मे च्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात लॉकडाऊन खुली केलेली आहे. या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार)
सदर करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे. या सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या 11,40,641 एवढी आहे. त्यामुळे राज्य शासनास सुमारे 700 कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार राहणार आहे, असेही श्री.परब यांनी सांगितले.