नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये (Nashik APMC) फळभाज्या आणि पालेभाज्यांची (Vegetables) आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोथिंबीर, कांदापातीने शंभरी आहे. कोथिंबीर 70 ते 100, तर कांदापातीचे दर गगनाला भिडले आहेत. कांदापातीचे दर 30 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हिरवी मिरची, वालपापडी, घेवडा, दोडके, गिलके, कारले आदी भाज्यांच्याही दरातही मोठी वाढ झाली आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. (हेही वाचा - Vegetables & Pulses' Price Surge: कडक उष्णतेमुळे देशात भाजीपाला आणि डाळींच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ; स्वयंपाकघरातील बजेट गडबडले)
शेतकऱ्यांचे उन्हामुळे आणि अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता उत्पादनात घट झाल्याने भाववाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. मनमाड शहरात सुमारे तासभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.
एप्रिलच्या मध्यापासून भाज्यांचे दर वाढत गेले आणि मागच्या काही आठवड्यांपासून दरवाढ टिपेला असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोजक्या भाज्यांचा अपवाद वगळता कोणतीही फळभाजी 250 ग्रॅममागे 25 रुपयांपेक्षा कमी नसल्याचे दिसत आहे. त्यातही फुलकोबीतील दरवाढ कायम असून, फुलकोबीसाठी 250 ग्रॅममागे 30 रुपये मोजावे लागत आहे.
मागच्या काही आठवड्यापासून पालेभाज्या तेजीत आहेत आणि कोथिंबीर; तसेच मेथीच्या जुडीचे दर 25 ते 30 रुपयांवर कायम आहेत. पालकाची जुडी १५ रुपयांवर आणि तांदुळजाची जुडी 10 ते 15 रुपयांवर स्थिर आहे. चिवळचे दर २५० ग्रॅममागे २० रुपये असे कायम आहेत.