Suicide At Bhayandar Railway Station: हातात हात घेऊन बाप-लेकाची ट्रेनखाली आत्महत्या; भाईंदर रेल्वे स्थानकाती घटना (Watch Video)
Suicide At Bhayandar Railway Station | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाईंदर रेल्वे स्थानक (Bhayandar Railway Station) परिसरात दोन पुरुषांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, दोघांची ओळख पटली असून ते मुलगा आणि वडील होते. मुलाचे नाव जय मेहता (वय- 30) आणि वडिलांचे नाव हरिष मेहता (वय- 60) अशी दोघांची नावे आहेत. वसई रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आत्मत्येचे नेमके कारण शोधले जात आहे. ही घटना सोमवारी (8 जुलै) सकाळी घडली.

मीरा रोडच्या दिशेने जाताना स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिले

वसई येथील वसंत नगरी परिसरात मेहता कुटुंब राहते. मेहता पिता-पुत्र घरातून नेमके केव्हा बाहेर पडले याबाबत माहिती मिळू शकली नाही. सोमवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास दोघांचाही मृतदेह भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळला. वसई पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हे पिता-पूत्र सोमवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. ते फलाट क्रमांक 6 वरुन खाली उतरले आणि मीरा रोडच्या दिशेने चालत निघाले. दरम्यान, रेल्वे रुळावरुन चालत असताना लोकल ट्रेनने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video))

शरीराचा चेंदामेंदा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक साठीतील गृहस्थ आणि तिशीतील मुलगा रेल्वे फलाटावरुन चालत निघाले आहेत. फलाटाच्या बाजूने एक लोकलही धावत गेली. त्यानंतर फलाट संपला ते खाली उतरले आणि रेल्वे रुळ ओलांडू लागले. दरम्यान, समोर आलेल्या ट्रेनने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. प्रथमदर्शनी हे रुळ ओलांडताना दिसत असले तरी, ते ट्रेन आल्याचे पाहून जाणीवपूर्वक रुळावर जातानाही दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे व्हिडिओवरुनतरी वाटते आहे. मात्र, अद्याप पोलीस तपास पूर्ण न झाल्याने नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, माहिती पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितले आहे की, दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली त्याचा आम्ही तपास करत आहोत. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून इतर माहिती घेतली जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

व्हिडिओ

आत्महत्या टाळण्यासाठी आणि मदतीसाठी हेल्पलाईन

दरम्यान, आत्महत्या हा कोणत्यारी प्रश्नावरचे अंतिम उत्तर असत नाही. आत्महत्या हा आपल्या दुर्बलपणाचा दाखला आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने जाऊ नये. जर आपणास अगदीच अस्वस्थ वाटू लागले किंवा आत्महत्येची लक्षणे दिसणाऱ्या कोणाला ओळखत असल्यास, योग्य समुपदेशनासाठी आत्महत्या प्रतिबंधक मंचांशी त्वरीत संपर्क साधा. तुम्ही हेल्पलाइन नंबर- 9152987821 वर संपर्क साधून मदत घेऊ शकता.