फोटो सौजन्य- Pixabay

कोरोना विषाणू (Coronavirus)  वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यात (Maharashtra) सुरुवातीला जमावबंदी कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी (Lockdown) लागू केली आहे. दरम्यान, केवळ अत्यावश्यक साहित्यांच्या विक्रीस परवानगी दिली जाते.मात्र, संपूर्ण देशात संचारबंदी असताना इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून मद्याची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना विरार परिसरात घडली आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी बार मालकाला अटक केले असून त्याच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष महंती असे अरोपीचे नाव असून तो विरार परिसरातील ओशियन बारचा मालक आहे. देशात 22 मार्च रोजी संचारबंदी लागू केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवांची विक्री करता येते. मात्र, संतोष संचारबंदीच्या काळात मद्यविक्री करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. संतोष याने घरपोच मद्यविक्री करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर द लिकर मॅन या नावाने खाते उघडून सर्रास दारू विक्री चालवली होती. संतोष हा ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने संतोष याच्याशी संपर्क साधला. यातून संतोष हा मद्यविक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी संतोषला त्याच्या राहत्या घरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संतोषच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली तातडीची बैठक

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत एकूण 724 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यात 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यापैंकी 45 नागरिक बरे झाल्याचेही सांगितले जात आहे.