Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्या कार वर काल हल्ला झाला आहे. बीड (Beed) मध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा दावा आहे. अज्ञातांनी त्यांना एकटं गाठून हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुदैवाने ते या हल्ल्यामधून बचावले आहेत. मात्र या घटनेनंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत आपल्याला आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात काही अज्ञात व्यक्तींनी वाघमारे यांच्यावर हल्ला केला. बैठक संपवून घरी परतत असताना काहींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या प्रकाराने ते घाबरून गेले. त्यांनाही काही दगड लागले. सोबत असलेल्या पुतण्यालाही दगड लागल्याचं ते म्हणाले आहेत. या प्रकारानंतर त्यांनी वारंवार मागणी करूनही मला सुरक्षा देण्यात आली नाही, अशी खंत व्यक्त करताना आज मला सुरक्षा असती तर हा हल्लाच झाला नसता असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वैजनाथ वाघमारे यांनी या हल्ल्या नंतर तक्रार देण्यासाठी केस तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. व्हिडिओ जारी करत वाघमारे यांनी आपण हल्ल्याची तीव्रता समजावी आणि आता तरी सुरक्षा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये  वैजनाथ वाघमारे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.  महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी तसेच शिवसेनेचं आणि बाळासाहेबांच्या  विचारांचं काम करण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  अंधारे यांची कोंडी करण्यासाठी आपण शिंदेंना साथ देण्यासाठी आलो नसल्याचं म्हटलं आहे.