Gateway of India (Photo Credits-ANI)

शनिवार, 28 मे रोजी, बीएमसीने (BMC) मुंबईतील (Mumbai) आठ पर्यटन स्थळांवर मुलांना कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) देण्यास सुरुवात केली. या लसी पहिला किंवा दुसरा डोस आवश्यक असलेल्या प्रौढांना देखील दिल्या जाऊ शकतात. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाइन वर्कर्स यांना या ठिकाणी बूस्टर डोस दिला जाईल. मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने मुले कुटुंबासह या पर्यटनस्थळांना भेट देतात, त्यादृष्टीने पर्यटनस्थळी बूथ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत 12 ते 14 वयोगटातील 10 टक्क्यांहून कमी मुलांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, तर महाराष्ट्रातील ही संख्या 24 टक्के आहे. मुलांच्या लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रशासनाने पर्यटनस्थळी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व ठिकाणी Covaxin आणि Covishield दोन्ही उपलब्ध असतील.

ही आहेत ती ठिकाणे-

गेटवे ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, वीरमाता जिजाबाई भोसले गार्डन, भायखळ्याचे प्राणीसंग्रहालय, अंधेरीची महाकाली लेणी, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर, घाटकोपरमधील आर सिटी मॉलमधील स्नो वर्ल्ड, फिनिक्स मॉल. (हेही वाचा: महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन? Covid-19 रुग्णांमध्ये वाढ, हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण 231 टक्क्यांनी वाढले)

राज्यातील आणि शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये अलीकडेच झालेल्या वाढीदरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी राज्यामध्ये संख्या वाढत राहिल्यास काही निर्बंध मजबूत करण्यासाठी राज्य पुन्हा विचारविनिमय  करेल असे सांगितले. दरम्यान, मुंबईमध्ये एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारपर्यंत शहरातील रुग्णालयांमध्ये 215 रुग्ण दाखल झाले होते, तर एप्रिलमध्ये अशा रुग्णांची संख्या केवळ 65 होती.