
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondar) हिला कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्याबरोबर उर्मिलाने गेल्या 5 वर्षांमध्ये साचत गेलेली भाजपविरोधी मते मांडली. आता प्रचाराच्या हटके पद्धतीमुळे ती सामान्य जनतेचे मन जिंकून घेताना दिसत आहे. अशात उर्मिलाच्या विरोधात भाजपाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून, पवई पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी ही तक्रार दाखल केले आहे.
उर्मिला मातोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्त्यव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला तिने एक मुलाखत दिली होती. त्यात तिने असे राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून म्हटल्याचा दावा केला आहे. सुरेश नाखवा यांनी तक्रारीचा फोटो फोटो ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तक्रारीमध्ये उर्मिलासोबत राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांचेही नाव आहे. (हेही वाचा: कॉंग्रेस पक्षाची उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला गुढी पाडव्याचा सण)
दरम्यान, उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलाचा जोरदार प्रचार चालू आहे. लोकांशी मराठीमध्ये बोलून, गुढी पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सामील होऊन, तर कधी लहान मुलांसाठी गाणे गावून तिने मतदारांना आकर्षित करून घ्यायला सुरुवात केली आहे. उर्मिलाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना गोंविदाच्या प्रचाराची आठवण येत आहे. उत्तर मुंबईत 2004 मध्ये अभिनेता गोंविदाने भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता.