UPSC परीक्षा 8-17 जानेवारी दरम्यान तर MPSC परीक्षा फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) फेब्रुवारी महिन्यात तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) 8 ते 17 जानेवारी दरम्यान होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्याने महााराष्ट्र लोकसेवा आयोगाने एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या किंवा केंद्र सरकारच्या ईडब्लूएस चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मूदत दिली आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिली. यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागस प्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी खुल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 15 जानेवारी पर्यंतची मूदत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. (MPSC SEBC Reservation: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता विशेष आरक्षणासाठी उमेदवारांनी कधी करायचाय ऑनलाईन अर्ज?)

कोरोना व्हायरस संकटामुळे आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. त्यानंतर कोविड-19 नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा परीक्षा रद्द करण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांची होणारी मानसिक कोंडी, बेरोजगारी यामुळे आयोगाने परीक्षा घेण्यासाठी दिशेने पाऊलं उचलायला सुरुवात केली. त्यानंतर लवकरच आता आयोगाच्या परीक्षा पार पडली अशी शक्यता वर्तवली जात आहे. (SSC, HSC Exam 2021: कोरोना महामारीमुळे 'या' महिन्यात दहावी, बारावीची परिक्षा घेण्याचा विचार सुरु)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षात अनेक परीक्षांचे घोळ झाले. यंदाच्या वर्षीही अद्याप संकट टळलेले नसल्याने आतापासूनच परीक्षांच्या नियोजनला सुरुवात झाली आहे. बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये तर, दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सामान्यपणे बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर, दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. मात्र कोरोना सावटामुळे शाळा नियमित सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा उशीरा घेतल्या जाणार आहेत.