Maharashtra Weather (Photo Credit- File Image)

Maharashtra Weather Forecast: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे चिंता निर्माण झाली आहे. अनेक दिवसांच्या तीव्र उष्णतेनंतर, महाराष्ट्रात आता हवामानात अनपेक्षित बदल होत आहेत. तापमानात घट झाल्याने कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या बदलामुळे अनेक प्रदेशांमध्ये नवीन चिंता, गडगडाटी वादळे, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटचा धोका वाढला आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशीम आणि यवतमाळ या 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या वादळामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (हेही वाचा - Chhatrapti Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा; उंची 91 फुट, CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले पूजन)

18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी - 

दरम्यान, अरबी समुद्रापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलामुळे मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान तज्ञांनी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विविध भागात ढगाळ आकाश, जोरदार वारे, विजांच्या कडकडाट आणि विखुरलेल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.