Covid-19 चाचणीसाठी वापर होणाऱ्या Swab Sticks चे घराघरात असुरक्षितपणे पॅकिंग; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
Screenshot from Ulhasnagar video (Photo Credits: Twitter)

देशभरात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवली आहे. लोकांचे संक्रमित होण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, रुग्णालयात बेडदेखील उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कित्येक रुग्णांचा जीव गेला आहे. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी सरकार नेहमीच प्रत्येकाला खबरदारी घेण्याचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देत आहे. अशात लोकांच्या जीवाशी खेळले जाण्याचा प्रकार मुंबईच्या (Mumbai) उल्हासनगरमधून (Ulhasnagar) समोर आला आहे, जो अत्यंत निराशाजनक आहे. उल्हासनगर येथे कोविड स्वॅब टेस्ट स्टिक (RT-PCR Swab Sticks) अत्यंत निष्काळजीपणे पॅक केले जात असल्याचे दिसून आले आहे.

सध्या कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) केली जाते. मात्र यामधील स्वॅब टेस्ट स्टिकच सुरक्षित नाही असे जर का तुम्हाला सांगितले तर? विश्वास बसत नाही ना? मात्र असाच प्रकार उल्हासनगर येथे घडत आहे. ऊल्हासनगरमध्ये कोणतीही काळजी न घेता कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टिकचे पॅकिंग केले जात आहे. अगदी महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेकजण या कामात गुंतले आहेत. हे चाचणी किट पॅक करताना सावधगिरी बाळगली जात नाही, सफाईची काळजी घेतली जात नाही. महत्वाचे म्हणजे हे स्टिक पॅक करणारी मुले आणि स्त्रिया यांनी हातमोजे परिधान केले नाही किंवा मास्क घातले नाही.

वृत्तानुसार, हा व्हिडिओ उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 2 परिसरातील खेमाणी ज्ञानेश्वर नगरातील झोपडपट्टीमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त करुणा जुईकर यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह बुधवारी दुपारी या भागाला भेट दिली. त्यांनी या प्रकारामध्ये सामील असलेल्या सर्वांवर कडक कारवाईचे आदेश दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वॅब स्टिक जप्त केले. (हेही वाचा: Andhra Pradesh मध्ये सापडला Covid-19 चा नवा स्ट्रेन; पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा 15 पट अधिक धोकादायक- Report)

खेमाणी ज्ञानेश्वर नगरातील किमान 10-15 घरातील लोक असे स्टिक पॅक करण्यात गुंतले आहेत. एका घरात एका दिवसाला साधारण 5000 स्टिक पॅक केल्या जातात. आता, लोकांना अशा प्रकारचे काम देणाऱ्या व्यक्तींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.