आईच्या वाढदिवसानिमित्त घडवली हेलिकॉप्टर राईड (Photo Credits: Instagram)

आईचे उपकार काहीही केले तरी या जन्मी तरी फिटणार नाहीत, हे अगदी खरे आहे. पण आईला आनंद, सुख, समाधान आपण नक्कीच देऊ शकतो. असाच एक प्रयत्न उल्हासनगर (Ulhasnagar) मधील एका मुलाने केला. प्रदीप गरड असे या मुलाचे नाव असून त्याने आईच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त तिला हेलिकॉप्टर राईड (Helicopter Ride) घडवली. मुलाचे हे अनोखं गिफ्ट पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून याचा व्हिडिओ प्रदीपने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोलापूरच्या बार्शी येथील रेखा यांचे उल्हासनगर मधील दिलीप गरड यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुलं झाली. मात्र मुलं लहान असतानाच पतीचे निधन झाले. त्यांच्या पतीचे निधन झाले त्यावेळी मोठा मुलगा सातवी, मधली मुलगी पाचवी आणि लहान मुलगा पहिलीला होता. त्यानंतर त्यांनी अपार कष्टाने मुलांना वाढवले. लोकांच्या घरची कामं करुन त्यांनी मुलांचे पालनपोषण केले.

पहा व्हिडिओ:

मोठा मुलगा प्रदीप शिकून नोकरीला लागला. पुढे आई आणि कुटुंबासह तो चाळीतून स्वत:च्या फ्लॅटमध्ये आला. पुढे त्याचं लग्न झालं. दोन मुलं झाली. मात्र या सगळ्यात आईने सहज बोलून दाखवलेली इच्छा तो विसरला नव्हता. घरावरुन जाणारं हेलिकॉप्टर पाहून त्यात कधीतरी बसायला आवडेल, असं त्याची आई सहज बोलली होती. त्यावेळी प्रदीप 12 वीत होता.

आईची ही इच्छा पूर्ण कशी करावी, याचा तो सातत्याने विचार करत होता. अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली आणि त्याने त्याची तयारी सुरु केली. वाढदिवसादिवशी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचं असं सांगत तो आईला जुहू एअरबेसला घेऊन गेला आणि सर्व कुटुंबियानी हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला. हे सगळं पाहिल्यानंतर आईला अश्रू अनावर झाले. कंठ दाटून आला. आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटलं. प्रदीपलाही आईची इच्छा पूर्ण करण्याचं समाधान लाभलं. सध्याच्या काळात आईचा इतका विचार करणारी मुलं मिळणं हे फार कमी पाहायला मिळतं. प्रदीपने एक चांगलं उदारहण समाजापुढे ठेवलं आहे.