जयदेव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे (संग्रहित, संपादित प्रतिमा)

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरुन सुरु झालेला ठाकरे कुटुंबातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. या वादातील एक पक्षकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र जयदेव ठाकरे यांनी या वादातून माघार घेतली आहे. हा वाद आपल्याला आता आणखी पुढे न्यायचा नाही. त्यामुळे ही याचिका आपण मागे घेत असल्याबाबतचा अर्ज जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाकडे शुक्रवारी (२ नोव्हेंबर )सादर केला. जयदेव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रातील मजकुराबाबत शंका होती. त्यामुळे या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरुन जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या संपत्तीचा वारसदार नेमका कोण? याबाबत न्यायालय का निर्णय देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, जयदेव यांच्या माघारीमुळे दोन्ही ठाकरे बंधूतील संपत्तीकलह तुर्तास तरी मिटल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हायात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपले राजकीय उत्तराधिकारी नेमले. त्यामुळे शिवसेना आणि पक्षाची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आली. मात्र, संपत्तीबाबत त्यांनी तसे न करता मृत्युपत्र लिहीले. या मृत्यपत्रातील मजकूरावरुनच जयदेव विरुद्ध उद्धव असा वाद निर्माण झाला. जयदेव यांनी मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांच्या मृत्युपत्राबाबत आव्हान दिले होते.

बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन उद्धव यांनी त्यांची संपत्ती हडप केल्याचा दावा जयदेव ठाकरे यांनी आपल्या याचिकेत केला होता. दरम्यान, न्यायालयात खटला सुरु असताना सुनावनी दरम्यान जयदेव यांनी अनेक गौप्यस्फो केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरुन या प्रकरणाची सुनावनी इन कॅमेरा घ्यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत प्रकरणाची सुनावनी इन कॅमेरा होती. दरम्यान, बाळासाहेबांना त्यांच्या संपत्तीतील वाटा आपल्याला द्यायचा होता. स्वत: बाळासाहेबांनी आपल्याला तसे सांगितले होते. पण, उद्धव आणि आपल्यात वाद नको यासाठी त्यांनी उद्धवकडे याबाबत वाच्यता न करण्याबद्दल आपल्याला सांगितले होते, असा दावा जयदेव यांनी केला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी २०११मध्ये काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या सह्या घेतल्या होत्या. मात्र, आपण कोणत्या कागदपत्रांवर सह्या करत आहोत याबाबत स्वत: बाळासाहेबांनाही कल्पना नव्हती, असेही जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाला सुनावनीवेळी सांगितले होते.