शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना जोरादार इशारा दिला आहे. आमच्याकडून पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव काढून घेण्यात आले. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत. आता इथेही विधनसभा अध्यक्षांनी काही वेडावाकडा निर्णय घेतला तर त्याविरोधातही आम्ही कोर्टात जाऊ. आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा वेडावाकडा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. त्यानंतर होणाऱ्या बदनामीमुळे समाजात तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असे सज्जड इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
निवासस्थान 'मातोश्री' येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय सुप्रिम कोर्टाचा निकाल आला आता आम्हीही तयार आहोत. आता जे काही होईल ते जनतेच्या कोर्टात, असे म्हणत ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस आणि भाजपला थेट आव्हानही दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोर्टाच्या निकालाचा आधार घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. कोर्टाच्या निकालामुळे हिंदुत्वाच्या बुरख्याखाली असलेला भाजपचा भेसूर चेहराच उघडा पडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तीच मुळात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी. ती शिवसेनाच आपल्या दावणीला बांधण्याचा घाट भाजपने घातला आहे. पण, न्यायालयाने यालोकांचा भेसूर चेहरा उघड केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात अब्रुचे इतके धिंडवडे निघाले तरीही हे लोक सत्तेला चिकटून आहेत. कोर्टाने दिलेले निर्देश आणि ओढलेले ताशेरे यावरुन स्पष्ट दिसत आहे की हे सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. त्यामुळे या सरकारला तात्पूरते जीवनदान मिळाले. पण, आता आम्हीही तयार आहोत. जे काय व्हायचे ते जनतेच्या कोर्टात होईल. जनतेचा जो काही कौल येईल, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.