उद्धव ठाकरे यांचा उद्या ओला दुष्काळ दौरा; पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची घेणार भेट
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

महाराष्ट्रात सध्या दोन गोष्टींची विशेष चर्चा सुरु आहे, एक म्हणजे भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) यांमधील सत्तावाटपाचा वाद आणि दुसरे म्हणजे अवकाळी पाऊस. सत्तेबाबत उभय पक्षांमध्ये चर्चा चालू आहेत. तर अवकाळी पावसाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना नेत्यांनी हजेरी लावली नाही. आता उद्या म्हणजे 3 नोव्हेंबर पासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ओला दुष्काळी दौरा करणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील.

ओल्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांची नासाडी झाली आहे. विदर्भातीलऔरंगाबाद जिल्ह्याला याचा फटका जास्त बसला आहे. आता उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावर्षी पावसाने बरेच नुकसान झाले आहे, पिकांची झालेली नासाडी यासह जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. (हेही वाचा: राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली बैठक, शिवसेना नेते यांची गैरहजेरी)

असा असेल उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम - 

उद्या सकाळी साधारण 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सर्वात प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील, कन्नड तालुक्यातील कानडगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे भेट देतील. त्यानंतर वैजापूर येथील गारजची पाहणी करतील. दुपारी 1 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेट घेऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडेल. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे.