शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Uddhav Thackeray Pandharpur Visit : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवार, २४ डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर दौऱ्यात ते मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेणार आहेत. मात्र, या निमित्ताने शिवसेनेकडून पंढरपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला' असे सांगत 'गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दै. सामनातून दिला आहे.

सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे

पंढरपूर दौऱ्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी सामनात म्हटले आहे की, 'आम्ही आज पंढरपूरला निघालो आहोत. अयोध्या वारी नंतर ही पंढरपूरची वारी आहे. पत्रकारांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारले, ‘अयोध्येवर ‘स्वारी’ करायला निघाला आहात त्यातून काय साध्य होणार?’ आताही तेच प्रश्न विचारले जात आहेत. ‘पंढरपूरवर स्वारीचे प्रयोजन काय?’ हे सवाल – जवाब निरर्थक आहेत. ही ‘स्वारी’ नसून फक्त वारी आहे. स्वारी जिंकण्यासाठी केली जाते. वारी एका श्रद्धेने, आशीर्वादासाठी होते. अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी चार वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे', असे म्हटले आहे. सोबतच 'सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे. त्यासाठी जनतेने उसळून उठायला हवे. म्हणूनच पंढरीच्या पावन भूमीवर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ हा लक्ष जनांच्या मुखातून उठणारा गगनभेदी जयघोष ऐकण्यासाठी आकाशामध्ये तेहतीस कोटी देवांच्या विमानांची दाटी होईल व ते आमच्या कार्यास आशीर्वाद देतील', असेही उद्धव यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करतात पण प्रश्न सुटत नाहीत

'महाराष्ट्रावर दुष्काळाचे भयंकर सावट आहे आणि देशाचे राज्यकर्ते सत्तेच्या मस्तवाल राजकारणात मशगूल आहेत. उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येनकेनप्रकारेण जिंकायच्याच यासाठी जी अक्कल पणाला लावली जात आहे ती राज्याच्या प्रगतीसाठी, दुष्काळ निवारणासाठी लावली तर राज्यात भूकबळी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. मुख्यमंत्री सालाबादाप्रमाणे आषाढीस येतात आणि महापूजा करून जातात. पण पंढरपूर, मंगळवेढा, टेंभुर्णीकरांच्या दुष्काळी प्रकल्पांचे प्रश्न तसेच आहेत. ही कुंभकर्णी झोप उडवण्यासाठीच माऊलीचा आशीर्वाद आम्ही घेत आहोत', असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही मोदी सरकार बेकार- राज ठाकरे)

दरम्यान, 'हा देश त्या अर्थाने विचित्रच म्हणावा लागेल. येथे बोफोर्स आणि राफेलला भाव मिळतो तोदेखील इतका की, अंबानीस एकाच विमान सौद्यात 30 हजार कोटींचा नगदी फायदा होतो, पण शेतकर्‍याच्या मालास भाव मिळत नाही. कांदा, टोमॅटोचे भाव तळात गेले. पाच-दहा पैसे किलोचाही भाव नाही. मातीमोल भावात कांदा विकला जात आहे. राफेल सौद्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः खास लक्ष घालतात, पण कांद्याचे उत्पादन जास्त झाले म्हणून कांदा जगाच्या बाजारपेठेत पाठवा हे शेतकर्‍यांचे म्हणणे कुणी ऐकत नाही. साखर कारखाने मोडीत काढून तेथेही बेकारी वाढवण्याचे राजकीय प्रयोग सुरू आहेतट, असा आहोपही शिवसेनेने केला आहे.