Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir Arrested) यांना क्राईम ब्रांच युनिटने अटक केली आहरे. खंडणी आणि सावकारी (Extortion and Threats) कायद्यान्वये भोईर यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यामध्ये ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी (27 डिसेंबर) रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुका पाहता उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. योगेश भोईर हे ठाकरे गटाचे कांदिवलीतील (Kandivali) उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

योगेश भोईर यांच्यावर विकासकांकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांच्या विरोधात समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या आधी त्यांना या प्रकरणात जामीनही मंजूर झाला होता. मात्र, याच प्रकारच्या एका जुन्या गुन्ह्यातले प्रकरण गुन्हे अन्वेशन विभागाकडे दाखल झाले. या प्रकरणात क्राईम ब्रँचने त्यांची सुमारे सहा तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. आज (बुधवार, 28 डिसेंबर) त्यांना 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा, Winter Assembly Session: टाळ मृदुंगाच्या गजरात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेसह विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, Watch Video)

योगेश भोईर यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, ज्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे त्याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांचे म्हणने असे की, भोईर यांच्या विरोधात दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, योगेश भोईर यांना अटक झाल्याचे वृत्त समजताच ठाकरे समर्थक अनेक शिवसैनिक भोईर यांच्या समर्थनार्थ जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भोईर यांना कांदीवली येथून दक्षिण मुंबई येथील क्राईम ब्रँच कार्यालयात हालविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कांदिवली येथील क्राईम ब्रँच समोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.