Narayan Rane | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मनोरुग्ण आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बोलत असतात. त्यांची कोणतीही दाणत नाही. मंदिरात गेले तरी ते एक रुपयाही दानपेटीत टाकत नाहीत, अशा भाषेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंडिया आघाडीच्या दिल्ली येथील रॅलीतून बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'अब की बार भाजपा तडीपार' हा नारा दिला होता. त्यावर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्याचा एक भाग म्हणून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या नेहमीच्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. आपण 40 वर्षे शिवसेना पक्षात होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यांचा शब्द प्रमाण असायचा. त्यांची शिवसैनिकांवर जरब होती. उद्धव ठाकरे यांच्यात ती धमक नाही. त्यांना केवळ भ्रष्टाचार करता येतो, अशा नेहमीच्याच मुद्द्यांचा आधार घेत राणे यांनी ठाकरेंवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Jalgaon Lok Sabha Constituency: नाराज भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना (UBT) च्या वाटेवर, कमळ सोडून मशाल हाती घेण्याची शक्यता)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती केली आहे. अशा मोठ्या व्यक्तीमत्वावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. त्यांच्यावर बोलण्याएवढी त्यांची लायकी किंवा कर्तृत्व नाही, असेही राणे म्हणाले. दरम्यान, हे मुख्यमंत्री असताना कोरोना काळ होता. त्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. लोक औषध आणि उपचारांवाचून तडफडत, मृत्यूमुखी पडत असताना हे मातोश्रीमध्ये बसून होते. ते कधीही मंत्रालयात गेले नाहीत. ज्यांना मंत्रालयात जाणे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात, असेही राणे म्हणाले. (हेही वाचा, Narayan Rane On Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम', नारायण राणे यांची टीका)

दरम्यान, खरे तर आपण कोणाला आरेतुरे करत नाही. माझा तो स्वभाव नाही. पण, उद्धव ठाकरे यांना आरेतुरेच करायला हवे. आम्ही शिवसेनेत असताना मातोश्रीवर जात असे. तेव्हा बाळासाहेब भेटायचे. हा केव्हाच (उद्धव ठाकरे) बाहेर येत नसे. एकदा त्याने मर्सिडीज घेतली. बाळासाहेब म्हणाले इनकम टॅक्सला दाखवली काय? यावर तो म्हणाला, त्यात काय दाखवायचे. अशा वृत्तीचा हा मनुष्य. मर्सिडीज घेण्यासाठी पैसे कुठूण आले असतील हे सांगण्याची गरज नाही. शेवटी मी माझ्या सीएकडे घेऊन गेलो. त्याला ती गाडी कागदोपत्री दाखविण्यास सांगितली, असेही नारायण राणे यांनी म्हटले.