महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे यांनी मला मारण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. ज्या व्यक्तीला हे कंत्राट दिले होते त्यानेच आपल्याला ही माहिती दिल्याचे राणे यांनी सांगितले. ठाकरे कुटुंबावर वारंवार हल्लाबोल करणाऱ्या नारायण राणे यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर हे गंभीर आरोप केले.
राणे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी अंडरवर्ल्ड किंगपिन छोटा राजन आणि छोटा शकील यांना मला ठार मारण्यासाठी ‘सुपारी’ दिली होती. परंतु मी जिवंत आहे. उद्धव ठाकरे खोटारडे आहेत. ठाकरे यांनीच सदा सरवणकर (शिंदे कॅम्पमध्ये असलेले शिवसेना आमदार) यांना मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करायला सांगितले. केवळ आपलीच नाही तर एकनाथ शिंदे यांचीही नक्षलवाद्यांकडून हत्या करण्याचा डाव उद्धव यांनी आखला होता, असे ते म्हणाले.
दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. त्यानंतर आज नारायण यांची पत्रकार परिषद पार पडली, जिथे त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी संयम राखावा. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्यासाठी ते जबाबदार असतील, असा इशारा राणे यांनी दिला. (हेही वाचा: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 10 कोटी खर्च करून झाले मनी लाँड्रिंग? CM Eknath Shinde आणि इतरांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल)
राणेंनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही टीका केली. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना फटकारल्याबद्दल त्यांनी उद्धव यांना फटकारले. ते म्हणाले, ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले, त्यांना ठाकरे आत्ता गद्दार म्हणतात. पण शिवसेना वाढीसाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय? कधी मातोश्री सोडून गेले काय ते? कधी विरोधकांच्या कानफाडीत तरी मारली काय? 1992 च्या दंगलीत अमुक तमुक केले असा डंका पिटतात परंतु प्रत्यक्षात काही केले नाही.