मोदी सरकार उघडे पडले आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ सिनेमा दिल्लीत पुन्हा झळकला- शिवसेना
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Rafale Deal: बंद लिफाफ्यात सरकारने राफेल सौद्याबाबत जी माहिती न्यायालयासमोर आणली त्यावर अवलंबून राहून न्यायालयाने आपले मत मांडले (निकाल नाही), पण बंद लिफाफ्यातील माहिती ‘अर्धसत्य’ होती व न्यायालयाने काहीतरी चुकीचा अर्थ घेतला आहे असे आता मोदी सरकारला सांगावे लागले हे धक्कादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे हसे झाले. मोदी सरकार उघडे पडले व ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा पडलेला सिनेमा दिल्लीत पुन्हा झळकला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांनी राफेल प्रकरणावरुन केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. बोफोर्स प्रकरणात सुरुवातीस लपवाछपवी झाली व नंतर सगळ्याच नाड्या सुटल्या. राफेलबाबत नेमके तेच घडत आहे. मुळात या प्रकरणास ‘नाडी’च नसल्याने एका हाताने कमरेवरचे सांभाळीत दुसर्‍या हाताने लढण्याचे अवसान आणले जात आहे, पण त्या फंदात कमरेवरचे सुटले आहे, असा टोलाही भाजप (BJP) सरकारला लगावाला आहे.

राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि विरोधकांनी सरकारला घेरले असताना आता मित्रपक्षांनीही भाजप सरकार आणि पर्यायाने पंतप्रधान मोदी यांनी घरचा आहेर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या लेखात , ' राफेल प्रकरणी, 126 विमानांच्या किमतीत अवघी 36 विमाने का? विमानांची किंमत किती? एचएएलसारखी सरकारी कंपनी असताना बुडत्या कंपनीला ऑफसेट पार्टनर का केले? हे मुख्य प्रश्न आहेत. देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्‍यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय? असा खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

  • आणखी काय म्हटले आहे ठाकरे यांनी

    दरम्यान, बोफोर्सचे भूत इतक्या वर्षांनंतरही काँग्रेस आणि गांधी परिवाराचा पिच्छा सोडत नाही तसे राफेलने मोदी सरकारचे मानगूट पकडले आहे. पाच राज्यांत भाजपचा दारुण पराभव झाल्यावर ‘भाजप’ सुतकात गेली व हे सुतक किमान महिनाभर चालेल असे वाटत असताना ‘राफेल’ प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट दिल्याचे सांगून अचानक जल्लोष सुरू झाला. भाजप कार्यालयासमोर फटाके फुटले, ढोल वाजू लागले. संसदेत भाजप खासदारांनी ‘राहुल गांधी यांनी माफी मागावी’ असे सांगत गदारोळ केला. हे जरा अतिच होतेय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजून घ्या, कुणालाही क्लीन चिट दिली नाही, असे अनेक कायदेतज्ञ सांगत असले तरी जल्लोष थांबला नाही. आता याच सर्वोच्च निकालाचे भाजपवर ‘बूमरँग’ झाले आहे. बंद लिफाफ्यात सरकारने राफेल सौद्याबाबत जी माहिती न्यायालयासमोर आणली त्यावर अवलंबून राहून न्यायालयाने आपले मत मांडले (निकाल नाही), पण बंद लिफाफ्यातील माहिती ‘अर्धसत्य’ होती व न्यायालयाने काहीतरी चुकीचा अर्थ घेतला आहे असे आता मोदी सरकारला सांगावे लागले हे धक्कादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे हसे झाले. मोदी सरकार उघडे पडले व ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा पडलेला सिनेमा दिल्लीत पुन्हा झळकला. (हेही वाचा, काँग्रेसचे कटकारस्थान उघड करण्यासाठी BJP कडून देशभरात तब्बल 70 पत्रकार परिषदांचे आयोजन)

  • राफेलसंबंधीचा अहवाल हिंदुस्थानच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) संसदेच्या लोकलेखा समितीस दिला व समितीने त्यास मान्यता दिली असे सरकारने बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयास कळवले व त्यावर न्यायालयाने मत व्यक्त करून राफेल चौकशीसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या. हा काँग्रेसला झटका व मोदी सरकारला दिलासा असल्याचे सांगणे म्हणजे ‘उथळ पाण्याचा खळखळाट’च ठरला.
  • ‘चौकीदार चोर है’ असे श्री. राहुल गांधी अलीकडे सांगत आहेत, पण चौकीदारांच्या मंडळींनी न्यायालयात शपथेवर खोटे सांगून ‘राफेल’ निर्णयात क्लीन चिट मिळविण्याचा प्रयोग केला व तो त्यांच्यावर उलटला. 36 राफेल विमानांच्या खरेदीत काही अनियमितता झाली काय, राफेल विमानांच्या किमती अचानक शंभर पटीने वाढवून कोणत्या उद्योगपतीचा फायदा झाला याची चौकशी व्हावी इतकीच मागणी याचिकाकर्त्यांनी केली व ती योग्यच होती. नक्की काय सौदा झाला ती माहिती गोपनीय असल्याचे सरकारने आधी न्यायालयास सांगितले व नंतर म्हणे ‘बंद लिफाफ्या’त काहीतरी भरून दिले. हा पोरखेळ आहे. कुठलीही सुनावणी न करता या प्रकरणात काहीच चुकीचे घडले नसल्याचा निर्वाळा देत अशी चौकशी करण्याची गरज नाही असे ‘गोंधळी’ मत न्यायालयाने नोंदवले.

    न्यायालयासमोर जे खोटे कागदोपत्री पुरावे आले त्यावर न्यायालयाने मत व्यक्त केले. आता हा सर्व घोळ म्हणजे ‘टायपिंग’ किंवा ‘ड्राफ्टिंग मिस्टेक’ असल्याचे सांगणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.