पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

भाजपास आजचे ‘अच्छे दिन’ ज्या श्रीरामाने दाखवले तो राम मात्र आजही अयोध्येत वनवासच भोगतो आहे. राममंदिराचे काय व्हायचे ते आता सर्वोच्च न्यायालयातच होईल असे सांगणे हे ढोंग आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयास विचारून पंचवीस वर्षांपूर्वी ‘राममंदिराची लढाई’ आपण सुरू केली नव्हती. आता न्यायालयाकडे बोट दाखवणे हा पळपुटेपणा आहे. श्रद्धेचे प्रश्न न्यायालयात सुटत नाहीत व हिंदूंच्या बाबतीत तर नाहीच नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

रामभक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली. तेव्हा भाजप सत्तेपर्यंत पोहोचला

राममंदिर व्हावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या महंत परमहंस दास यांना फैजाबाद पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले व इस्पितळात कोंडले. काय तर म्हणे, परमहंस दास यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. राममंदिरासाठी प्राणार्पण करू इच्छिणाऱ्या हिंदुत्ववाद्यांची चिंता भाजप कधीपासून करू लागले? तीन दशकांपूर्वी अयोध्येच्या करसेवेत हजारो रामभक्त उतरले होते. त्यांच्यावर झालेल्या बेछूट गोळीबारात पाचशेच्या जवळपास रामभक्तांनी हौतात्म्य पत्करले. रामभक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली. तेव्हा कोठे आजचा भाजप दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला', अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी भाजपला करुन दिली आहे.

मंदिर उभारा नाहीतर ‘राम नाम सत्य’होईल

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. राष्ट्रपतींपासून उत्तर प्रदेशच्या राज्यपालापर्यंत, पंतप्रधानांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली आहे? बाबरीवर हातोडा शिवसैनिकांनी मारला. बाबरी उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. आता तुमचे राज्य आले तर राममंदिर तरी उभारा. नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनातून भाजपास दिला आहे.