रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. स्थानिक प्रकल्पाला विरोध करण्यावर ठाम आहेत तर, सत्ताधारी प्रकल्प करण्यावर ठाम दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बारसू (Barsu) गावाला भेट देत आहेत. या ठिकाणी ते बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधकांची भेट घेणार आहेत.
कसा असेल उद्धव ठाकरे यांचा दौरा?
उद्धव ठाकरे साधारण सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या मुंबई येथील निवासस्थान 'मातोश्री' येथून रत्नागिरीसाठी रवाना होतील. बारसू येथे जाण्यासाठी उद्धव ठाकरे हे हेलीकॉप्टरने रवाना होणार आहेत. या वेळी ते बारसू प्रकल्प विरोधी आंदोलकांची भेट घेतील. उल्लेखनीय असे की, उद्धव ठाकरे हे बारसू प्रकल्पाच्या समर्थकांचीही भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यात दोन ठिकाणी भेट देतील. या सोलगाव फाटा, देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी प्रकल्प विरोधकांची भेट घेतील. ही भेट सकाळच्या सत्रात होईल. दुपारनंतर ते गिरमादेवी कोंड येथे प्रसारमाध्यमांशी संवाध साधतील, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Barsu Refinery Project: बारसू प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण शरद पवारांच्या भेटीला)
दरम्यान, शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांचा शनिवारी होणारा दौरा, प्रकल्प समर्थकांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिफायनरीच्या जागेवर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत या भागात बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करणारे आदेश देखील या भागात लागू करण्यात आले असल्याचे समजते.
मुंबईपासून 400 किमी अंतरावर असलेल्या राजापूर तालुक्यातील गावाला ठाकरे भेट देणार आहेत आणि या भागातील मेगा ऑईल रिफायनरीसाठी जमीन देण्याच्या सरकारच्या योजनेला विरोध करणाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.ठाकरे यांनी यापूर्वी बारसू-सोलगाव परिसरात सभा घेण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली.
जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि ठाणे येथील अतिरिक्त कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कंपन्या राजपूत तालुक्यात तैनात करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.