TikTok: खा. उदयनराजे भोसले यांचे 'प्यार का तोहफा तेरा' गाण्यावर बेधुंद नृत्य; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल
उदयनराजे भोसले (फोटो सौजन्य-फेसबुक)

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा स्वतःचा रुबाबा आहे, तोरा आहे. साताऱ्यात तर त्यांचे अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. आपल्या मस्तमौजी, खिलाडू वृत्तीमुळेही ते खूपच लोकप्रिय आहेत. आता राजेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते चक्क 'प्यार का तोहफा तेरा' गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांच्या एका चाहत्याने टिकटॉक (TikTok) वर हा व्हिडीओ अपलोड केला होता. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकमत न्यूज 18 ने याबाबतचे वृत्त देऊन व्हिडीओही पब्लिश केला आहे.

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. इथे उदयनराजे भोसले डोक्यावर पांढरी टोपी घालून 'प्यार का तोहफा तेरा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या ठेक्याला चाहत्यांनी आणि उपस्थित जमावानेही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. हे गाणे तोहफा या चित्रपटातील असून, जितेंद्र आणि जयाप्रदा यांच्यावर ते चित्रित करण्यात आले होते. या गाण्यातील नृत्यशैलीमुळे ते त्यावेळी खूप लोकप्रिय ठरले होते. आता पुन्हा उदयनराजेंमुळे हे गाणे चर्चेत आले आहे. (हा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

दरम्यान, उदयनराजे भोसले यांना संगीताची आवड आहे हे आपण अनेक मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये पाहिले आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी गाणी गावून आपली सिनेमाची आवड प्रदर्शित केली आहे. ‘आता माझी सटकली’ या संवादालाही त्यांनी वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओने त्यांची नृत्याची शैलीही पहायला मिळाली आहे.